आष्टा नगरपालिकेतील टेंडरवरुन भाजपा- राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांमध्ये मुद्यावरील वाद गुद्यावर जाऊन प्रशासक काळात राडा झाला. या राड्याला भाजपा राष्ट्रवादीची राजकीय किनार लागली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. आष्टा नगरपालिकेत २०२१ पासून प्रशासक राज सुरु आहे. या काळातील पालिकेतील कोट्यावधीची विकास कामे आणी ठेकेदारी चार वर्ष्यापासून चर्चेचा विषय ठरत आहे. यातील प्रक्रियाच नागरिकांच्या लक्षात येईनाशी झाली आहे. आष्टा नगर पालिकेच्यावतीने सुमारे पस्तीस लाख रुपये अंदाज पत्रकीय सहा रस्ते बोळकाँक्रिटीकरण, रस्ते खडीकरण डांबरीकरण कामांची निविदा मागवण्यात आली होती, सर्वच कामे दहा लाख रुपये किमतीची असल्याने ऑफ लाईन प्रक्रिया होती.
मंगळवारी टेंडर भरण्याची दुपारी चार वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती. पाच वाजता लिफाफे उघडण्यात येणार होते. त्यानुसार नगरपालिकेत ही प्रक्रिया सुरु होती. दरम्यान दुपारी एका गटाचा लिफाफा गायब झाला. टेंडर भरण्या वरून भाजपाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी यांच्यात संघर्ष झाला. शिवीगाळ आणि हमरी तुमरीही झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. प्रकरण हातगाईवर आले, पालिकेत एकच राडा झाला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. भाजपा आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे समर्थक नगरपालिकेत, पालिकेबाहेर जमा झाले. यामुळे नगरपालिकेतील वातावरण तापले. तणाव वाढला.
माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी तत्परतेने नगरपालिका परिसरात बंदोबस्त वाढवला. भाजपा राष्ट्रवादीतील या संघर्षाची चर्चा शहरात रंगली आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी समर्थक नगरपालिकेत होते. राष्ट्रवादी समर्थकांनी निविदा प्रक्रिया रद्द व्हावी, निविदा अशी प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात यावी प्रशासनाकडे केली आहे.