वाळवा येथील हुतात्मा कारखान्याचे गळीत हंगामात ५ लाख मे. टन गाळप 

पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि., नागनाथ अण्णानगर वाळवे या कारखान्याचा ४२ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ सोमवार ता. १० मार्च रोजी संपन्न झाला. कारखान्याने या गळीत हंगामात ५ लाख मे. टनापेक्षा जास्त गाळप केले. सांगता समारंभानिमित्त आयोजित केलेल्या जाहिर सभेची सुरुवात पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन झाले. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. त्यानंतर गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये सर्वाधिक ऊस तोडणी वाहतूकीचे काम करणाऱ्या प्रथम तीन बैलगाडी, ट्रॅक्टर, अंगद व तोडणी मशिन कंत्राटदारांचा, वाहन मालकांचा व मुकादमाचा रोख रक्कम, ट्रॉफी, पुष्पहार, श्रीफळ देऊन चेअरमन वैभवकाका नायकवडी व उपस्थित संचालक, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी म्हणाले, ऊसाचे टंचाईमुळे राज्यातील व देशातील बहुतांश कारखान्याने बंद झाले आहेत. गेल्या पावसाळ्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे आडसाली ऊसाच्या वजनात एकरी  १० टनापर्यंत व खोडवा ऊसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली. ऊसाच्या कमतरतेमुळे हंगाम चालण्याबाबतचे सर्वांचे अंदाज फसले व यावर्षीचा गळीत हंगाम लवकर बंद झाला. दिवसेंदिवस कारखाने गाळप क्षमता वाढवायला लागलेत त्याच स्पर्धेत आपल्याला सुध्दा टिकले पाहिजे. आपले ऊसाचे क्षेत्र मर्यादित असल्यामुळे आपणास शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुध्दीमत्तासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन, चांगल्या प्रतीचे ऊस बेणे, ऊस रोपे वापरुन प्रती एकरी ऊसाचे उत्पन्न वाढवायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे.