Walmik Karad: वाल्मिक कराडने कोर्टाला हात जोडले; न्यायाधीशांनी आरोपींना विचारले ‘हे’ प्रश्न, कोर्टात नेमकं काय घडलं?

संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली. केज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात होण्याची शक्यता आहे. तशी मागणी सरकारी पक्षाने कोर्टाकडे केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली.
सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना काही प्रश्न विचारले. वकील मिळाले आहेत का? चार्जशीट मिळाली आहे का? असे प्रश्न कोर्टाने विचारले. त्यावर आरोपींना ‘हो’ म्हणत उत्तर दिलं. याशिवाय तपासाबद्दलही कोर्टाने फिर्यादी पक्षाला विचारलं. तपासावर काही आक्षेप आहेत का? हा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी ‘नाही’ म्हटलं.

सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली. कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं. इतर आरोपींनी हात वर केले. परंतु वाल्मिक कराडने तसं केलं नाही. त्याने कोर्टाला हात जोडले. त्याच्या कृतीमागे नेमकं कारण काय? हे समजू शकलं नाही. वाल्मिक कराडसह इतर आरोपी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीसाठी हजर होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.

आरोपींच्या वकिलांनी केल्या तीन मागण्या

  • आरोपपत्रामध्ये फोन कॉल्सचा उल्लेख आहे. खंडणी, हत्या या काळातले सीडीआर तपास यंत्रणांना मिळालालेले आहेत. मात्र ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत.
  • आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा उल्लेख आहे. परंतु त्याचे पुरावे आरोपींच्या वकिलांना मिळालेले नाहीत, ते देण्यात यावेत.
  • कलम १६४ प्रमाणे साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत आणि कलम १८ प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदवले गेलेले आहेत. ते जबाब मिळावेत.

संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आणखी एक एफआयआर दाखल होणार आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. सोशल मीडियातील माहितीच्या आधारावर त्यांनी हे सांगितलं. ज्यांनी आरोपींना पोसलं, ज्यांनी आरोपींना आर्थिक मदत केली आणि ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे तपास यंत्रणांनी कोर्टाकडे दोषारोपपत्र सादर केलेलं असलं तरी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क अबाधित ठेवला आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरु असल्याची माहिती आहे. कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे मांडणार आहे. मात्र पहिल्या दिवशीच्या सुनावणीला निकम हे गैरहजर होते.