हुपरी शहरातील नगरपरिषदेचे रुपडे पालटून टाकण्यासाठी आमदार डॉ. अशोकराव माने यांनी कंबर कसली असून नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसह इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी १४ कोटी २५ लाख निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. हुपरी येथील जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये नगरपरिषदेचे कामकाज चालते त्याची मुदत आता संपत आहे. येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यादृष्टीने आमदारांनी उचलले पाऊल अभिनंदनास पात्र आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत हुपरी शहराकरीता नगरपरिषद बांधकाम १० कोटी, वाचनालय इमारत बांधकाम ५० लाख, भव्य मल्टिपर्पज व्हॉल बांधकाम ५० लाख, उद्यान, हरित पट्टे तसेच विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी २५ लाख, जलतरण तलाव उभारणीसाठी ५० लाख, भाजी मंडई व मटण मार्केट बांधकाम १ कोटी, सुर्यतलाव परिसरात शिवसृष्टी उभारणे करीता १ कोटी व शहरातील शासकीय जागेवर सोलर पॅनल बसविण्यासाठी ५० लाख असे एकूण १४ कोटी २५ लाखांच्या निधीची मागणी नगरविकास विभागाकडे केली आहे. यातून हुपरी शहराला समृद्ध करण्यासाठी आमदारांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.