पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल- बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

 
पट्टणकोडोली, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश यासह अन्य राज्याचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल- बिरदेव यात्रा उत्साहात पार पडली. पाच दिवस चाललेल्या यात्रेमध्ये समस्त धनगर समाज, हेगडे, बोते, मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

 रविवार दि. १२ रोजी हेगडे, बोते यांचा नैवेद्य, दुपारी भाकणूक व श्रींची पहिली पालखी मिरवणूक पार पडली. सोमवार दि. १३ रोजी श्रींची दुसरी व तिसरी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दि. १४ रोजी भर यात्रा, सार्वजनिक नैवेद्य व श्रींची चौथी पालखी मिरवणूक पार पडली. बुधवार दि. १५ रोजी फुटयात्रा व फरांडेबाबांचा गोंधळ नृत्य सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. याचदिवशी श्रींची पाचवी अखेरची पालखी व आराधना प्रसाद घालण्यात आला. गुरुवार दि. १६ रोजी फरांडेबाबांकडून भागीरथी देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर मानकरी, धनगर समाज व ग्रामस्थ यांच्यावतीने फरांडेबाबांना निरोप देऊन पाच दिवस चाललेल्या यात्रेची सांगता करण्यात आली.