पूर्वी ग्रामीण भागात गल्ली-गल्लीत चौका-चौकात इर्षेने होळी पेटायच्या. मात्र संघर्ष नसायचा. एक मैत्री असायची. पण काळ बदलत चालला तसा होळी साजरी करण्याची पद्धतही बदलली. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करताना भल्या पहाटे उठून बाल मंडळी डोळे पुसत पुसत होळीच्या राखेचे गोळे हातात घेऊन रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाकडे धुळवड मागायचे. एक सण म्हणून नाही नाही करत त्यांच्या हातावर सुट्टे असतील तेवढे पैसे ठेवत असत. यातून जमलेल्या पैशातून रानामाळात जाऊन भडंग करून पार्टी रंगायची. सध्या काळ बदलला.
खिशातील चिल्लर गायब आणि डिजिटल चलनाचा जमाना आला. मग धुळवड मागणाऱ्या बाल मंडळींनीही धुळवड मागण्याची पद्धत बदलली असल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले. चक्क हातात स्कॅनर घेऊनच लहान मुले मैदानात उतरली. ओ काका.. ओ मामा.. पैसे नाहीत मग राहूदे ह्या स्कॅनरवर सोडा असे म्हणताच त्यांचीही चांगलीच पंचायत झाली आणि मग स्कॅन मारून धुळवड दिली जात असल्याचे पहायला मिळाले यामुळे कालाय तस्मैय नमः म्हणायची वेळ आली.