हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील वीर महिला मंडळाचा जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम

रांगोळी येथे वीर महिला मंडळाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. वीर महिला मंडळ रांगोळीच्या सदस्यांनी बाहुबली येथील आचार्य शांतिसागर महाराज साधक आश्रमाला भेट देऊन वृद्धाश्रमातील महिलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्ध महिलांसाठी हा दिवस एक अविस्मरणीय अनुभव ठरला. वीर महिला मंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या सोबत मोकळ्या मनाने संवाद साधला, गप्पा मारल्या, आठवणींना उजाळा दिला. अचानक घेतलेल्या या भेटीने वृद्धाश्रमातील महिलांचे मन भरून आले.

काही वृद्ध मातांनी भेटीसाठी आलेल्या महिलांना मिठी मारली आणि आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या, आज खूप दिवसांनी आम्ही मनमोकळे हसलो, आनंद लुटला. आम्हाला खूप दिवसांनी घरच्या माणसांची आठवण आली. वीर महिला मंडळाच्या सदस्यांनी वृद्ध महिलांसाठी गाणी, खेळ, हास्यविनोद यासारख्या विशेष मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामुळे वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. यावेळी काही वृद्ध महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या भेटीच्या शेवटी वृद्ध मातांनी महिला मंडळाच्या सदस्यांना आशीर्वाद देत पुन्हा भेटण्याची विनंती केली.

या उपक्रमातून वृद्धाश्रमातील महिलांना काही क्षण आनंदाचे आणि आपुलकीचे अनुभवता आले. या उपक्रमाचे समाजभर कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे वृद्ध व्यक्तींना मानसिक आधार मिळतो, हा एक सकारात्मक संदेश या भेटीतून सर्वांना मिळाला.