लोकसभेच्या मागील पाच निवडणुकींतील लढती, झालेले मतदान आणि विजयी उमेदवाराच्या मताची टक्केवारी पाहिली तर सरळ लढतीत किमान ४८ टक्के, तर बहुरंगी लढतीत किमान ४३ टक्के मते घेतली तरच गुलाल लागला आहे.
त्यामुळे या निवडणुकीत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातील विजयी उमेदवाराला ४८ टक्के मात्र हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यात अटीतटीची लढत असल्याने येथे ३६ टक्के मते घेणाऱ्याला गुलाल लागणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने उमेदवारांच्या ‘थिंक टँक’ने जोडण्या लावल्या आहेत.
‘कोल्हापूर’ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक, तर आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यासह विविध पक्ष व अपक्ष असे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हे जरी खरे असले तरी खरी लढत मंडलिक व शाहू छत्रपती यांच्यातच होत आहे. इतर उमेदवार किती मते घेतात यावर विजयाचा लंबक अवलंबून असला तरी अपक्षांचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही उमेदवारांनी जोडण्या लावल्या आहेत.
मागील पाच निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी ६९.९० टक्के मतदान झाले आहे. मताची आकडेवारी आणि लढत पाहिली तर येथे विजयी होण्यासाठी किमान ४८ टक्के मते घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात १९ लाख २१ हजार ९३१ मतदान आहे, सरासरी ७० टक्के मतदान झाले तर विजयी उमेदवाराला किमान ६ लाख ४५ हजार ७६८ मतांची गरज भासणार आहे.
हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने, आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचित आघाडीकडून डी. सी. पाटील यांच्यासह तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे बहुरंगी लढत असल्याने छोट्या राजकीय पक्षांसह अपक्षांनी घेतलेले मतदान दिग्गजांची अडचण करू शकतात. या मतदारसंघात १८ लाख ०१ हजार २०३ मतदान आहे.