इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी, जिल्हास्तरावरून सर्व विभागांची भरारी पथके नेमून अचानक भेटी देण्याबाबत आदेश काढणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर विभागीय मंडळातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची दोन टप्प्यात बैठक येथील विवेकानंद महाविद्यालयात झाली. परीक्षेत गैरप्रकार करणा-या कोणत्याही स्तरावरील व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहसचिव बी.एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, बोर्डाचे अधिक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दूधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, आम्रपाल बनसोडे, प्रणाली जमदग्री, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले की, शाळा स्तरावर उजळणी घेऊन पुरेशा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांनाही शिक्षा सूचीची माहिती द्या. विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग आयोजित करा. कॉपीमुक्तीची शपथ घ्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करा. विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी, काळाबरोबर तुम्ही आपल्यात सुधारणा केली नाही तर बंद पडलेल्या कंपनी सारखी वाईट अवस्था होईल. नवीन गोष्टी आत्मसात करणे आपले काम आहे, आज याठिकाणी बोडच्या कामासंबंधी उजळणी झाली. पीपीटी मिळाल्यावर स्टाफ बैठक घेवून सर्वांना अवगत करायचे आहे. पीपीटीसह शिक्षक पालक, विद्यार्थी यांची बैठक घेवून त्याचे इतिवृत्त ठेवायचे, ते भेटीसाठी आलेल्या अधिकान्यांना दाखवायचे आहे, अशा सूचना दिल्या. परीक्षेबाबत इत्यंभूत माहिती देण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची व यापुढे मानसिकता बदलावी लागणार याची चर्चा बैठकीनंतर मुख्याध्यापकांमध्ये होती. दरम्यान, तब्बल सात वर्षानंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर सभा झाली. हटके व वैशिष्ट्यपूर्ण सभेमुळे शाळा प्रमुखांचा नूरच पालटला.
राज्य मंडळ व विभागीय मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षा कामकाजाचा आढावा घेणार आहे. परीक्षा काळातील व परीक्षोत्तर गैरमार्ग बंद करण्यात येतील. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने परीक्षा कडक नियंत्रणात घेण्याचा निर्धार झाला. चालू महिन्यात शाळास्तरावर आणि नंतर परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रावर कॉपीमुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येईल. भयमुक्त व निर्भयपणे विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम घेतला जाईल. विद्यार्थी पालक व शिक्षकांची मानसिकता बदलण्यासाठी शाळास्तरावर बैठका घेण्याचे व इतिवृत्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सामूहिक कॉपी व पेपरफुटी सारख्या गंभीर प्रकरणी केंद्र शाळेचे अनुदान बंद करणे, शाळा स्वयम् अर्थसहाय्यित करण्यासाठी शिफारस करणे, मंडळाकडून शाळांचे संकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. परीक्षेत नेमून दिलेले काम टाळल्यास कारवाई होणार आहे. शाळेकडे विभागीय मंडळाची कोणतीही थकबाकी असल्यास विद्यार्थी प्रवेशपत्रे रोखण्यात येतील. पर्यायाने जबाबदारी शाळेवर निश्चित करण्य येईल. गैरहजर शाळा प्रमुखांना शिक्षणाधिकान्यांमार्फत नोटीसा पाठवण्यात येतील.