हातकणंगले लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस! ‘मातोश्री’वर तक्रार

हातकणंगले लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मदत न झाल्याचा आरोप करत शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ‘मातोश्री’वर तक्रार केली आहे.जिल्ह्यातील राजकीय बेरजेचे गणित ग्राह्य धरून काँग्रेसचे नेते शिवसेनेला (यूबीटी) मदत करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत ही तेच गणित पाहायला मिळणार, त्यामुळे शाहूवाडीत काँग्रेस शिवसेना (यूबीटी) सोबत राहणार हा शब्द काँग्रेस नेत्यांकडून घ्या, असे गाऱ्हाण शाहुवाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले आहे.लोकसभेतील उमेदवार, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे विधानसभा निवडणुकीला देखील महाविकास आघाडीतून शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे (यूबीटी)उमेदवार होते.त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र लोकसभेत माजी आमदार पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाला शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.