धक्कादायक, रंगपंचमी खेळताना गुदद्वारात पाण्याचा फवारा मारल्याने तरुणाचा मृत्यू, टिटवाळ्यातील घटना

होळीच्या दुसऱ्यादिवशी रंगपंचमी असते. त्याला धुलीवंदनही म्हणतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण राज्यात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. रंगपंचमीच्या दिवशी लोक जुन वैर विसरुन परस्पररांना रंग लावतात. मनातले मतभेद, द्वेष या दिवशी संपून नात्याची एक नवीन सुरुवात होते. रंगपंचमी खेळताना एक उत्साह असतो. पण काहींना आपण सण साजरा करतोय याचा विसर पडतो. काही जण या दिवशी मद्यपान करुन धिंगाणा घालतात. वाद, राडे करतात. यंदाही रंगपंचमी खेळताना काही जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

कल्याणमधील टिटवाळा येथे धुलीवंदनाच्या दिवशी मित्रांच्या विकृत मजेमुळे एक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. धुलीवंदनाच्या दिवशी तीन मित्रांनी मिळून पाण्याचा फवारा मित्राच्या पॅन्टीत मारला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सत्यप्रकाश उपाध्यायचा असे मृत तरुणाचे नाव आहे.

‘मित्रासोबत काय करतोय, हेच या लोकांना कळलं नाही’

दारू पिऊन धुलीवंदन साजरं करताना आपण आपल्या मित्रासोबत काय करतोय, हेच या लोकांना कळलं नाही. त्यांनी सत्यप्रकाश उपाध्याय याच्या गुदद्वारात जोरदार पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे अंतर्गत इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तिघा मित्रावर गुन्हा दाखल केलाय. मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा अशी या तीन मित्रांची नाव असून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. दारू पिऊन धुलीवंदन साजरं करताना दुर्घटना घडल्याची पोलिसांची माहिती असून टिटवाळा पोलिसांचा तपास सुरू आहे.

लोहगड परिसरात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला

लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत पिंपरी-चिंचवड सांगवी येथील मानसी गोविंदपुरकर, या तरुणीचा मृतदेह आढळला असून. 18 मार्च 2025 रोजी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती. सकाळी 8:56 वाजता लोहगड तिकीट घराजवळील सीसीटीव्हीमध्ये ती एकटी दिसली होती, मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता. लोणावळा ग्रामीण पोलीस व तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यु टीमला तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला. स्ट्रेचरद्वारे मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता, याचा तपास सुरू आहे