माणगांव परिषदेमुळे इतिहासाची निर्मिती झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व जगासमोर आले, असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांनी काढले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आयोजित माणगाव परिषदेच्या १०५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नेतृत्व जगाला माणगाव परिषदेत राजर्षी छ. शाहु महाराज यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माहित झाले. आपल्याला काय करायचे आहे यासाठी दूरदृष्टी असायला हवी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या नात्याप्रमाणे मुलांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह उभी करा त्यासाठी निधी दिला जाईल असे मंत्री शिरसाठ यांनी सांगितले.
महाडच्या चवदार तळ्याच्या शंभराव्या वर्धापन दिना निमित्त शंभर कोटीची तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माणगाव येथे उभारण्यात आलेल्या लंडन हाऊसच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त करुन बार्टीचे संचालक सुनील वारे यांना माणगाव परिषद विकास आराखड्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी माणगाव परिषदेचे शिल्पकार आप्पासाहेब पाटील यांनी सामाजिक क्रांतीसाठी बलिदान दिले असल्याचे सांगितले. दरम्यान सुरुवातीस त्यांनी माणगाव परिषदेच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले. यावेळी प्रास्ताविक माणगावचे सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी केले. त्यांनी माणगाव स्मारकाची देखभाल बार्टीच्यावतीने व्हावी, अशी मागणी केली. स्वागत आम. अशोकराव माने यांनी केले.