रुई उरुसातील करमणुकीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली

हातकणंगले तालुक्यातील रुई येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जाणारे ह.अब्दुल मालिकसो यांचा उरूस सोमवार ता. २४ रोजी असून गावातील असहिष्णु व तणावपूर्ण वातावरण याचा विचार करता पोलीस प्रशासनाने उरुसातील करमणुकीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. यामुळे रुई गावचा उरूस हा कार्यक्रमाविनाच होणार आहे. रुईच्या उरुसाला शाकाहारी बरोबरच मांसाहारी नैवेद्याचा देखील मान असतो त्यामुळे गावात दोन दिवस भाविकांबरोबर पाहुणे व मित्र मंडळींची मोठी गर्दी असते.

गेली अनेक वर्षे उरूस कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्याकडून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते त्यामध्ये तमाशा, ऑर्केस्ट्रा, विविध शर्यती यांचे नेटके नियोजन केले जाते. पण मागील काही कार्यक्रमादरम्यान काही समाजकंटकांकडून मुद्दामहून गोंधळ करण्याचा प्रयत्न झाला, कमिटीने या प्रकाराला कंटाळून कार्यक्रमाचे ठिकाण देखील बदलले तर त्याचा परिणाम उलटा झाला कार्यक्रमाचे ठिकाण का बदलले या कारणावरून कार्यक्रम बंद पाडण्यात आला.

त्यावेळी देखील पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. उरुसाला आलेल्या अनेक बाहेरगावच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली तर उरूस कमिटी याबाबत हतबल झाली होती. मागील काही दिवसांपासून गावामध्ये अनेक वेळा गटागटात वादविवाद झाले त्यातूनच हाणामारी, खून यासारख्या भयानक घटना गावात घडल्या आहेत. गावातील काही तरुण बाहेरील भाडोत्री गुंड बोलावून गावात दहशत माजवत आहेत त्यामुळे गावात दादागिरीचे प्रकार वाढले आहेत. अनेक छोट्या-मोठ्या भांडणामुळे अनेकांना पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

परिणामी गावाचे नाव पोलिसांच्या हिट लिस्टवर आले असून या सर्व गंभीर घटनांचा विचार करून पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरुसाच्या सर्वच मनोरंजनासह आदी कार्यक्रमांची परवानगी नाकारली असल्याचे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येत आहे. तर गावातील अनियंत्रित घटनांमुळे उरूस कमिटी व ग्रामपंचायत देखील कार्यक्रम करण्याबाबत कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. लॉकडाऊन वगळता कार्यक्रमाविना उरूस होणे ही खेदाची गोष्ट असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.