शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात झाले, या गोष्टीला महत्व आहे, बाकी श्रेयवादाच्या लढाईत आपल्याला फार रस नाही, आता या मतदारसंघातील उर्वरित गावांचा डोंगरी भागात समावेश करा, अशी आमची जुनी मागणी अधिवेशनात मांडून सकारात्मक निर्णय करून घ्या, असे आवाहन युवा नेते, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना केले. वैभव पाटील यांचा खानापूर घाटमाथाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैभव पाटील म्हणाले, आपल्या संस्थेची इमारत विद्यापीठाच्या उपकेंद्रास सुरूवातीला देण्यास तयार आहोत. परिसरात नवनवीन शैक्षणिक दालने खुली करून इथल्या तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून अद्यावत शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर नवनवीन अभ्यासक्रम आणि संशोधन या ठिकाणी व्हावे, यासाठी यापुढेही प्रयत्न करू. तसेच कोणतीही मदत लागल्यास सदैव सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी राजेंद्र माने, मारुती भगत, प्राचार्य डॉ. निवास वरेकर, डॉ. विजय मुळीक आदींचीही भाषणे झाली.