बलवडी भा. (ता. खानापूर) येथील ज्योर्तिलिंग वाङ्मय साहित्य सेवा संस्थेच्यावतीने येत्या २५ डिसेंबररोजी ३२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांतर्गत ‘संत साहित्य संमेलन’ आहे. संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन आहे. ही माहिती संयोजक अॅड. सतीश लोखंडे यांनी दिली. अॅड. लोखंडे म्हणाले, यावर्षी तीन सत्रांमध्ये संमेलनाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनास प्रारंभ होईल. संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. विजया संगवई विचार मंचावर ज्येष्ठ साहित्यिक श्रीरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत आहे. कृष्णा वैद्यकीय रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुनील लाड (कराड) यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. धनंजय होनमाने स्वागताध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात ग्रामीण कथाकार विजय जाधव (ब्रह्मानंदनगर) यांचे कथाकथन होणार आहे. तिसऱ्या सत्रात लक्ष्मण हेम्बाडे (मंगळवेढा) यांच्या अध्यक्षतेखाली कवी किरण शिंदे कविकट्ट्यावर कविसंमेलन रंगणार आहे.
संमेलनात ‘ज्योतिर्लिंग वाङ्मय साहित्य’ पुरस्कार अॅड. कृष्णा पाटील (चिखलगोठण) यांना देण्यात येणार आहे. शाहीर बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ‘साहित्य पुरस्कार’ शाहीर जयवंतराव रणदिवे (दिघंची) यांना, डॉ. एच. के. पवार यांच्या स्मरणार्थ ‘कृषी पुरस्कार’ अशोक सोपान पवार (बलवडी) यांना, इंदुमती पवार यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श माता’ पुरस्कार वनिता महाडिक यांना, मारुती जाधव (आबा गुरुजी) यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार हणमंत सूर्यवंशी यांना, भि. रा. पवार यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार संजय पवार यांना, बी. डी. कुंभार यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श प्रेरणा’ पुरस्कार कवी वसंत पाटील (पणुंब्रे, शिराळा), पांडुरंग भानुदास सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श पिता’ पुरस्कार बालेचाँद शिकलगार यांना देण्यात येणार आहे. याशिवाय राजेंद्र पवार, अॅड. कैलास पवार, अॅड. शुभांगी शिंदे (सांडगेवाडी), रिया जाधव (जाधवनगर), रवींद्र कुंभार, डॉ. अनिकेत मांगले, पीयूष पवार यांचा विशेष सत्कार होणार आहे.