सांगोला शहरातील जुना धान्य बाजार परिसर बनला मटका प्रेमींचे अभ्यास केंद्र

सांगोला शहरातील ज्या भागात पुर्वी दर रविवारी मोठा धान्य बाजार भरत होता, त्याच परिसरात सध्या खुलेआम चालणाऱ्या बेकायदेशीर मटका व्यवसायाने जुन्या धान्य बाजार परिसराला कल्याण मुंबई मटका शौकीन लोकांसाठी अभ्यास केंद्र अशी नवी ओळख निर्माण केली असल्याचे दिसून येत आहे. तसेच पूर्वी ज्या ठिकाणी मराठी शाळा नंबर १ ची इमारत होती, ती इमारत पाडून भोपळे रोड येथे स्थलांतरीत करण्यात आली व खुल्या जागा भाडेतत्वाने देण्यात आल्या. आडोश्याला वाटणाऱ्या या धान्य बाजार परिसरात नेहमी सकाळ, दुपार, संध्याकाळ असणारी गर्दीही मटका शौकीन लोकांची दिसते. कुणी कागद-पेपर तर कुणी चार्ट घेऊन सकाळीच बसलेले असतात.

आज काय ओपन- काय क्लोज येणार यावर चर्चेत रंगाताना दिसून येते. टपरी व शेड मारून खुलेआम मटका व्यवसायिकांनी या परिसरात पाय पसरले आहेत. सांगोला शहरातील हा परिसर नेहमी वर्दळीचा असतो. याच भागातील रोडवरून जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, नागरिक ये- जा करतात. सहाजिकच कुठे नेवून ठेवलाय, आमचा सांगोला अशीच खंत मनोमनी व्यक्त करत असतील यात मात्र शंका नाही. व्यापारी बाजारपेठ असल्याने याच परिसरात लाखो रुपयांचे भांडवल गुंतवलेली मोठी इतर दुकाने आहेत, परंतु गाळेधारकांच्या दुकानापेक्ष्या जास्त वर्दळ मटका व ऑनलाईन जुगार व्यवसाय असणाऱ्या परिसरातील दुकानावर असते.