पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी करता येणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. १ एप्रिल ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजलेपासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत निर्णय झाला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 

भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन उटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होणार आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.