मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त सोमवारी (ता. १) सुमारे दीड लाख भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली होती. भाविकांच्या मांदियाळीने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिमद्वार परिसर गजबजून गेला होता.
दरम्यान, श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील तीन नंबरच्या पत्रा शेडमध्ये गेली होती. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा अवधी लागत होता.
या एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केले. स्नान झाल्यानंतर भाविक दर्शन रांगेकडे मार्गस्थ झाले होते. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग तीन नंबर पत्राशेडच्या पुढे गेली होती.
मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठलाचे वास्तव्य महिनाभर गोपाळपूर येथील विष्णुपद येथे असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी विठ्ठल विष्णूच्या रूपात गायी चरायला येतो, अशी मान्यता असल्याने एकादशीला आलेले हजारो भाविक विष्णुपद येथे दर्शनासाठी जाताना दिसून आले. विष्णुपद येथे मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी २५ पोलिस कर्मचारी, मंदिर समितीचे ३० कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग उभारण्यात आले असून, भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय विष्णुपद परिसरामध्ये स्वच्छतेसाठी ३० स्वयंसेवकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
आम्ही सोमवारी पहाटे पाच वाजता तीन नंबरच्या पत्रा शेड दर्शन रांगेमध्ये उभा होतो. जवळपास सहा तासांनंतर सकाळी ११ वाजता श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन प्राप्त झाले. विठुरायाच्या दर्शनाने पावन झालो.
