फोन पे, पेटीएम, गुगल पे विसरून जा! 1 एप्रिलपासून हे ग्राहक नाही करू शकणार UPI पेमेंट

जर तुम्ही युनिफाईड पेमेंटस इंटरफेसचा (UPI) वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत देशात युपीआयचा सर्रास वापर होतो. भाजी विक्रेत्यापासून ते तिकीट काऊंटरपर्यंत युपीआय कोड स्कॅन करून सहज पेमेंट होते. पण आता राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) एक नवीन नियम लागू केला आहे. त्यानुसार, 1 एप्रिल 2025 रोजीपासून या ग्राहकांना युपीआय पेमेंट करता येणार नाही. विविध स्कॅम आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.

काय आहे नियम?

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा मोबाईल क्रमांक 90 दिवस बंद असेल तर त्यावरून यापुढे युपीआय पेमेंट करता येणार नाही. हा मोबाईल क्रमांक युपीआयच्या संबंधित बँक खात्यावरून डीलिंक करण्यात येईल. त्यामुळे UPI सिस्टिम अधिक सुरक्षित होईल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील, असा दावा करण्यात येत आहे.

इनॲक्टिव्ह क्रमांकाचा धोका काय?

टेलिकॉम कंपन्या इनॲक्टिव्ह क्रमांक नवीन युझर्सला देतात. अशात जेव्हा जुन्या ग्राहकाचा युपीआय क्रमांक त्याच मोबाईल क्रमांकावर जोडलेला असेल तर नवीन युझर्स त्यावर अनधिकृतपणे व्यवहार करू शकतो. ही एक मोठी जोखीम आहे. अशा माध्यमातून काही फ्रॉड झाल्याचे समोर आल्यानंतर आता NPCI ने 90 दिवसांच्या कालमर्यादेचा उपाय समोर आणला आहे.

जर तुमचा मोबाईल इनॲक्टिव्ह असेल तर?

जर तुमचा मोबाईल क्रमांक इनॲक्टिव्ह असेल आणि तो तुमच्या बँक खात्याशी लिंक्ड असेल तर तुम्ही यापुढे UPI सेवेचा वापर करू शकणार नाही. याचा अर्थ Google Pay, PhonePe, Paytm सारखी ॲप्स वापरता येणार नाही. NPCI ने सर्व बँकांना आणि UPI प्लॅटफॉर्म्सला प्रत्येक आठवड्याला इनॲक्टिव्ह क्रमांकाची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही हे निश्चित होईल. त्यामुळे फसवणूक आणि स्कॅमला आळा बसेल. भविष्यात युपीआय आयडीसोबत मोबाईल क्रमांक लिंक करायचा की नाही याची अगोदर ग्राहकांना परवानगी द्यावी लागणार आहे.