तीन वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची बदली; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. त्या बैठकिट आटपाडी एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार व इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.