ढकलपास बंद! पास होण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यांना २१ गुणांची अट

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल, पण अंतिम सत्र परीक्षेत दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यास २१ गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ५ ते २५ एप्रिल या काळात होणार आहे. पण, अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करता येणार नाही. अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटीत संबंधित विषय शिक्षकाने अतिरिक्त अध्यापन करून त्याची जूनमध्ये फेरपरीक्षा घ्यायची आहे. त्यात तो उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

पण, अनेकदा काही शिक्षक पुढील उठाठेव नको म्हणून तोंडी परीक्षेत १० पैकी १० गुण देतात आणि लेखी परीक्षेला तो विद्यार्थी पास होईल इतके गुण देतात, अशीही चर्चा आहे. मात्र, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानकपणे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्यास त्या विषय शिक्षकावर कारवाई होऊ शकते.

उत्तरपत्रिकांची होणार अचानक पडताळणी

पाचवी व आठवीच्या सरसकट विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत बंद झाली असून त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, अशा सूचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यांच्या उत्तरपत्रिका २० वर्षे जतन करून ठेवाव्या लागणार असून अचानकपणे कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे.- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

उत्तीर्ण होण्याचे समीकरण असे…

  • इयत्ता पाचवी : दहा गुणांची तोंडी तर ४० गुणांची लेखी परीक्षा होते. पाच विषयांची एकूण २५० गुणांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयात किमान १८ गुण पडलेला विद्यार्थी उत्तीर्ण होतो.
  • इयत्ता आठवी : दहा गुणांची तोंडी आणि ५० गुणांची लेखी परीक्षा होते. या विद्यार्थ्यांना एकूण सहा विषय असतात. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यास किमान २१ गुण आवश्यक आहेत.