इचलकरंजी येथे खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक मनोज साळुंखेसह तिघांना कोठडी

इचलकरंजी येथील डायना स्टार सीएनसी मशीन वर्कशॉपजवळील एका ऑफिसवजा रूममध्ये एका तरुणाला पाच लाख रुपयांची खंडणी मागून दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या माजी मगरसेवक मनोज साळुंखे, शहानवाज मुजावर,बाजीराव कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील सराफाकडे ५ लाखाची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी फिर्यादीने ५० हजार रुपये दिले असतानाही आरोपींनी उर्वरित ४.५० लाख रुपये देण्यासाठी धमकी दिली. “तू उर्वरित पैसे दिले नाहीस तर तुला उघडानागडा करून तुझा व्हिडीओ व्हायरल करू, पोलिसांकडे गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू,” अशी धमकी आरोपींनी दिली.

त्यानंतर भीतीत असलेल्या फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पो नि सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साने करत आहेत. तिघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर सुनावणीवेळी मनोज साळुंखे यांचे वतीने अॅड. सचिन माने यांनी युक्तीवाद मांडताना फिर्यादीने आयसीआयसीआय बँकेतील सोन्याचा अपहार लपविण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत फिर्यादी दानवाडे याची चौकशी करण्याची मागणी केली. युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.