इचलकरंजीतील अनेक भागातील पाणी पुरवठा ठप्प

इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये चबुतरा बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली जलवाहिनी चबुतराबाजूने घेण्यास सुरुवात केली आहे. सदरचे काम आणखी दोन-तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह काही भागातील पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान, सदरचे काम तातडीने पूर्ण करून पाणी पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

 येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकामध्ये धर्मवीर छ. संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सदर चौकात असलेले जुना चौकाचे बांधकाम फोडण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्याची खुदाई काम करून चबुतरा बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी चबुतरा बांधकाममध्ये जमिनीखालून गेलेली जलवाहिनी अडथळा ठरत आहे. त्यामुळे चबुतरास अडथळा होणार नाही त्या दृष्टीने पाईपचे काम सुरू केले आहे. राजाराम स्टेडियमवरील जल कुंभामधून आलेल्या या मुख्य जलवाहिनी वरून कोल्हापूर रोड, कामगार चाळ, सोन्या मारुती परिसर, आंबेडकर पुतळा परिसर, निमनगा झोपडपट्टी, मुक्त सैनिक वसाहत, वखार भाग, नेहरूनगर, सुतारमळा आदी मुख्य रस्त्यावरील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून पाईप बदलण्याचे काम सुरू आहे.

सदर कामासाठी आणखी दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य रस्ता परिसरातील भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा उपलब्ध साठा काटकसरीने करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.