आपले पाळीव प्राणी सगळ्यांनाच प्रिय असतात. इस्लामपूर येथे आपल्या पाळीव कुत्र्याला शेजारील अमेरीकन जातीचे पाळीव कुत्रे भुंकल्याच्या कारणावरुन त्या कुत्र्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी पती-पत्नी विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी इस्लामपूर येथील बिरोबानगर परिसरात घडली होती. सचिन रामचंद्र वळसे, रुपाली सचिन वळसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनीषा शिवाजी नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादित म्हणते आहे कि मी व माझे अमेरिकन बुली जातीचे मादी कुत्रे दूध आणण्यासाठी दुकानला जात असताना सचिन वळसे यांचे घरासमोर बसलेले त्यांचे कुत्रे माझ्या कुत्र्यास भुंकले त्यामुळे ते त्या कुत्र्याचे जवळ गेले. याचा राग मनात धरुन सचिन याने कुऱ्हाडीने माझ्या कुत्र्याच्या मानेवर, पाठीत वार करुन गंभीर जखमी केले आहे. तसेच रुपाली वळसे हिने कुत्रे पुन्हा दारात आले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सचिन यानेही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.