सांगोला नगरपरिषदेकडून वर्षानुवर्षे थकीत असलेल्या गाळा भाडेकरूंवर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. गाळा भाडेकरूंना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी थकीत रक्कम नगरपरिषद कार्यालयात जमा केलेली नाही. यामुळे त्यांना ७ दिवसाची नोटीस, ३ दिवसाची नोटीस व २४ तासांची अंतिम नोटीस बजावूनदेखील ज्यांनी रक्कम भरली नाही, त्यांचे गाळे सील करण्यात आले आहेत. यामध्ये संग्राम नागनाथ सक्रे, भाजी मंडई लगत नौशाद पापा मुलाणी, त्रिमूर्ती टाकी समोर मयूर राजेंद्र डोंगरे, जमील हसन शेख, विजय वसंत सुपेकर यांचे गाळे सील केले.
ही कारवाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सचिन पाडे, कर निरीक्षक रोहित गाडे, सागर पवार, आनंद हुलजंतीकर, रामा सागर, निकोप ठोकळे, रमेश मोरे यांनी केली. नागरिकांनी कटू कार्यवाही टाळायची असेल तर सांगोला शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे. दरम्यान, कर व प्रशासकीय अधिकारी महेश रजपूत व अस्मिता निकम आणि पाणीपुरवठा अभियंता करण सरोदे यांच्या नेतृत्वात पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कार्यवाही सुरू आहे.