सांगोला-कुर्ला बस माळशिरस येथे पडली बंद; प्रवाशांची गैरसोय

सांगोला-कुर्ला बस मंगळवारी ऐन १२ वाजण्याच्या उन्हात माळशिरस शहरालगत ५८ फाटा येथे बंद पडली. बस प्रवाशांनी भरलेली होती. ऐन उन्हात या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. ऊन, खाली तापलेला डांबरी रस्ता यामुळे प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. जवळ झाडाची सावली नसल्याने उन्हात थांबावे लागले. त्यात पंढरपूरहून येणाऱ्या बस प्रवाशाने भरून येत असल्याने या नादुरुस्त बसमधील प्रवाशी बसवून देण्यास वाहकाला कसरत करावी लागली.

दुपारचे १.३० वाजले तरी १० ते १५ प्रवाशी रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहत होते. सर्वच आगारातील अनेक बस नादुरुस्त आहेत. ज्या आहेत, त्या शेवटच्या थांब्यापर्यंत पोहचतील याची खात्री बसचालकांनाही नाही. अनेक बस नादुरुस्त झाल्याने व नव्याने बस उपलब्ध न झाल्याने अनेक आगारांनी बसेसच्या फेऱ्या बंद केल्याने नागरिकांची अडचण होत आहे.