इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय सीसीटीव्हीच्या कक्षेत; १५३ सीसीटीव्ही बसवणार

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह सिमाभागातील रूग्णांसाठी एक आधारवड ठरत आहे. दिवसेंदिवस रुग्णालयात अनेक महत्वपूर्ण बदल होत चालले असून हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदायिनी ठरत आहे. हे शासकीय हॉस्पिटल असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल होत असतात. काही वेळी विविध कारणावरून रुग्णांच्या सोबत मोठा जमाव जमत असतो. काही घटनांमध्ये तणाव निर्माण होवून रुग्णालयाची मोडतोड, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे रूग्णालय सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यासाठी आता प्रयत्नशील असून सदरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६५ लाख रुपये निधी मधून १५३ सीसीटीव्ही कॅमेरे येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात बसविण्यात येणार आहेत. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये, प्रवेशद्वार, वॉर्ड, ओपीडी, औषध वाटप केंद्र, शस्त्रक्रिया विभाग आणि पार्किंग परिसर यांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमुळे रुग्णालयातील सुरक्षितता भक्कम होणार आहे.

तसेच रुग्णालयाच्या परिसरात होणारे वाद, कर्मचारी किंवा रुग्णांमध्ये होणारे वादविवाद अन्य घटनांवर तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. आयजीएमच्या प्रवेश व्दाराजवळ पोलीस चौकी आहे. परंतु पोलीस बंदोबस्त नसतो. त्यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडत असतात. हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम अतिम टप्प्यात असले तरी त्याठिकाणी पोलीसबंदोबस्त नेमणेही आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.