महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची धुमाळी सुरू आहे. तिकीट मिळणे, अर्ज भरणे, प्रचार करणे अशा सगळ्या धामधुमीत उमेदवारांची निवड आणि तिकिटांचं वाटपालाही जोर आलाय. अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगही केल्याचं दिसतंय. अशात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली आहे. तसेच हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचं आवाहन केले आहे. यड्रावकर आणि जयंत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट झाली . या भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित होते. जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना साकडं घातलं . शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी चर्चेत होतं.
राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडुन आले आहेत. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मोहिते राजेंद्र पाटील यड्रावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते मात्र 2019 साली उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ते निवडुन आले.मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मैत्रीचे संबध हे त्याचे आधीपासूनचे आहेत आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी राजेंद्र टोपे यांनी देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. आता जयंत पाटील यांनी भेट घेतली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांची भेट ही खूप काही सांगून जाते.