इचलकरंजी महापालिकेने शहरातील कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर टाकण्यासाठी घंटागाडी चालक आणि त्यावर सहाय्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, ईएसआय दवाखाना सुविधा मिळावी, भविष्य निर्वाह निधी सुविधा सुरु करावी यासह विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली.
काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्याने संयुक्त बैठक झाल्यावर जानेवारी २०२५ पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार आणि ईएसआय कार्ड देण्याचा निर्णय झाला होता. तरीही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. कंत्राटदार कर्मचाऱ्यांचा वारंवार विश्वासघात करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या पूर्ण मागण्या मंजुर होईपर्यंत काम सुरू न करण्याचा इशारा कामगार नेते ए. बी. पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.