इचलकरंजी शहरातील घंटागाडीवरील कर्मचान्यांच्या संपामुळे नागरिकांना त्रास; महानगरपालिकेने तोडगा काढावा

इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्था अंतर्गत एन. डी. के या कंपनीला घंटागाडीमधून घरोघरी जावून कचरा उचलण्याचे काम दिले आहे. या कंपनीकडून २०३ कर्मचारी व मदतनिस यांची नेमणूक केली आहे. पण कंपनीकडून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचा साप्ताहिक सुट्टी दिवशीचा वेतन कपात करणे व इतर विविध मागण्यासाठी संबंधीत कंपनीला वारंवार निवेदन देवूनही कोणतेही कार्यवाही न केल्याने या कंपनीच्या कर्मचाऱ्यानि शुक्रवारपासून बेमुदत काम बंद पुकारले आहे. 

अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या जाणाऱ्या साफसफाईच्या कामामध्ये संप करून नागरिकांना त्रास देणे चुकीचे आहे. संप करण्याऐवजी दुसरा पर्याय निवडून कामगारांनी आपल्या मागण्या पदरात पाडून घेणे आवश्यक होते. तसेच महानगरपालिका प्रशासनाने ही यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अयशस्वी ठरला. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार निवडल्याने त्याचा विनाकारण त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. २०३ कर्मचाऱ्यांपैकी १०९ कर्मचारी सध्या कामात आहेत.

दोन सत्रात घरटी कचरा गोळा करीत असले तरी अनेक भागामध्ये कचरा वेळच्यावेळी गोळा केला जात नसल्याने नागरिकांपुढे समस्या निर्माण झाली आहे. तर अनेक नागरिक घरातील कचरा गटारीत टाकत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तेव्हा याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देवून संपात तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.