आठव्यांदा निवडून आलेल्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र…..

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोषापासून स्वतःला लांब ठेवत माध्यमांपासून दूर राहिलेल्या प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी आज प्रथमच मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या हातात माईक न देताच स्वतःच भूमिका मांडली. कमी मताधिक्याच्या मुद्द्यावर नाराज कार्यकर्त्यांची त्यांनी काहीअंशी समजूत काढत आपणाला शांत बसून चालणार नाही. आपणाला पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागावे लागेल असा संदेश दिला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज प्रथमच कार्यकर्त्यांना सामोरे गेले. सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा विचार न करता नव्या जोमाने कामाला लागा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत. ज्या त्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील इच्छुक कार्यकर्त्यांची छाननी करा. त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करा. विधानसभा निवडणुकीत आपणाला मिळालेले कमी मताधिक्य हे केवळ आपलेच चित्र नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे.

ईव्हीएम यंत्रणेबद्दल सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे आणि ते खरेही आहे. शेजारच्याच शिराळा तालुक्यातील एका गावात सगळीच मते एकाच पक्षाच्या उमेदवाराला मिळाली.अखंड गावात विरोधी गटाचा एकही मतदार असू नये, असे होऊच कसे शकते? यावरून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांच्या केंद्रावर ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे समोर येत आहे. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊया. कोणाला काही म्हणत न बसता आपण आपले काम सुरू करूया. कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागावे. आपण निवडणुकीत माझे काम प्रामाणिकपणे केल्याबद्दल मी समाधानी आहे.