हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे व्हिडिओ कॉल करत गळफास घेऊन तरुणाने संपवले जीवन

पुलाची शिरोली येथील अभिजित माने हा फॅब्रिकेशनचे कामे करतो, त्याला फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुलाची शिरोली येथे घरी आला होता. पण त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. दररोजच्या या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी गेली असल्याचे समजते. शनिवारी दुपारी घरी बिर्याणी करीत असताना अभिजितने पत्नीला व्हिडिओ कॉल केला.

तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार असे त्याने पत्नीला सांगत होता. हे सांगत असतानाच बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला. व प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हि घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.