देशातील सर्वात मौल्यवान कंपनी अब्जाधीश मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअरधारकांची आज बल्ले-बल्ले झाली. मजबूत तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज २.५ टक्क्यांनी चढले. तर शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले होते ज्यात कंपनीने निव्वळ नफ्यात २७% वाढ नोंदवली. कंपनीच्या तिमाही निकालांची प्रतिक्रिया आज बाजारात उमटली आणि आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी कंपनीच्या समभागांनी २.५% पेक्षा जास्त उडी घेतली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक दुपारी १ वाजता २.४३% उडी घेत २३२०.२५ रुपयांवर व्यवहार करत होता. तर ट्रेडिंग दरम्यान स्टॉकने २३२४.६० रुपयांवर चढले. यासह कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ४०,००० कोटी रुपयांनी वाढले आणि १५.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दरम्यान, ब्रोकरेज कंपन्यांनीही रिलायन्सच्या समभागांची लक्ष्य किंमत वाढवली आहे.
RIL शेअरवर ब्रोकरेज उत्साही
विश्लेषकांनुसार आता रिलायन्स जिओचे रोलआउट पूर्ण होत असल्यामुळे कंपनीचे लक्ष 5G च्या कमाईवर केंद्रित असेल. कंपनीने टॅरिफ वाढवण्याची शक्यता नाकारली असली तरी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे म्हणणे आहे की 5G पासून ग्राहक संख्या आणि ग्राहकांच्या सहभागातील वाढ लक्षात घेत कंपनी लवकरच किंवा नंतर टॅरिफ वाढवू शकते. ब्रोकरेजने रिलायन्सच्या समभागांना BUY रेटिंग दिले आणि लक्ष्य किंमत २,७२५ रुपये निश्चित केली. तसेच ICICI सिक्युरिटीजनेही रिलायन्सच्या समभागांची लक्ष्य किंमत २,५८५ रुपये ठेवली आहे.
