मुंबईच्या माजी महापौरांचा ठाकरेंना रामराम

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद (Mayor) भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले दिग्गज नेते दत्ता दळवी यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

ठाकरेंना रामराम

शिवसेनेतील पदांचा घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचं दळवींनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. परंतु लवकरच दळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. त्यानुसार काही तासातच त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या शिवसेनेतील पदांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. लोकसभा-विधानसभेनंतर आता आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेत इनकमिंग वाढताना दिसत आहे. अशातच महापौरपद भूषवणारा तगडा नेता पक्षात खेचून शिंदे मुंबई महापालिका निवडणुकीआधी ताकद वाढवली आहे.

दत्ता दळवी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ते तीन वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवर राहिले आहेत. त्यांनी २००५ ते २००७ या काळात मुंबईचे महापौरपदही (Mayor) भूषवले आहे. ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा राहिला आहे. शिवसेनेत त्यांनी उपनेतेपद सांभाळले आहे.

दरम्यान, दत्ता दळवींनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही जण मुंबई महानगरपालिकेला त्यांची जहागीर समजतात, परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईकरांना चांगले घर आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार काम करत आहे. आतापर्यंत उबाठातील ४५ ते ५० नगरसेवक त्यांच्या मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील विविध पक्षांचे सुमारे ७० विद्यमान नगरसेवक शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे महायुती मुंबई महापालिकेवरही आपला भगवा फडकवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.