पत्नी सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे निघालेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे पदस्पर्श पुळूज (ता. पंढरपूर) येथे झाल्याची आख्यायिका आहे. श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला भीमा नदीच्या पात्रात भजन म्हणत तेथे आठवणी जागवल्या जातात.
आजही नदीपात्रात ही पदचिन्हे असून नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर त्यांचे दर्शन घडते. शिवाय या घटनेचा उल्लेख श्री लिंगेश्वर पुराणातही आहे. तिर्ऱ्हे मार्गे पंढरपूरला जाताना पुळूज हे भीमा नदीच्या काठावरचे गाव आहे.
या नदीच्या पात्रात एका मोठ्या दगडी शिळेवर म्हणजे खडकावर ही पदचिन्हे आहेत. उजव्या पायाचे पाउल आहे, त्यास रामाची पावले असे येथे म्हटले जाते. नदीपात्रात पाणी असताना याचे दर्शन दुर्लभ, पण नदी कोरडी असते तेव्हा पदचिन्ह पाहण्यासाठी गर्दी होते.
एव्हाना कधी नदीपात्र कोरडे झाले तरी या पदचिन्हांच्यासमोर पुढच्याबाजूस एक पाण्याचा छोटा डोह किंवा एक छोटा प्रवाह कायम प्रवाहित असल्याचे इतिहास अभ्यासक परशुराम कोरे यांनी सांगितले.
तसेच येथील पदचिन्हे आणि प्रभू श्रीरामांचा येथील वास याबद्दल या पुराणात चौथा व पाचवा अध्याय आहे. या अध्यायात याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. यंदा प्रभू श्रीराम यांची सपरिवार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून याची आजच्यादिनी महापूजा व महाप्रसाद करण्यात येणार आहे. नदी, तलाव किंवा पाण्याचा स्त्रोत जिथेजिथे त्यात्याठिकाणी शक्यतो प्रभू श्रीरामांचा लंकेकडे जातना वास असायचा असे अनेक उदाहरणांवरुन समजते.
उजव्या पायाचे चिन्ह
एक फूट लांब असे मोठे हे पदचिन्ह असून ते उजव्या पायाचे आहे. तसेच या पदचिन्हांना निसर्गात: दगडी काठ आहे. जो आजतागायत आहे तसा आहे, हे विशेष. (Right foot symbol)
येथे स्वयंभू श्री लिंगेश्वर नावाचे शिवलिंग व हेमाडपंती मंदिर होते. सध्या त्याचे अस्तित्व नसल्यासारखे असले तरी आजही येथे या शिवलिंगाची व या पावलांची पूजा केली जाते. पंढरपूरचे कीर्तनकार सूर्याजी भोसले व मी स्वयंभू श्री लिंगेश्वर पुराण हा २०० पानांचा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित केला आहे.
यामध्ये इसवी सन १९२२ मध्ये यादव राजा दुसरा सिंघन याने हे मंदिर बांधल्याच्या उल्लेख शिलालेखात आहे. पंढरी महात्म्य, वारकरी संप्रदाय व इतर ग्रंथांतून माहिती संकलित केली आहे. यातही या पदचिन्हांचा उल्लेख असणारे दोन अध्याय आहेत.