विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या राखी संपत शिकलगार (रा. वेताळ पेठ) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर मुलासह चौघांवर गावभाग पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. दीर रतन प्रकाश शिकलगार, भावजय सौ. भारती रतन शिकलगार, मुलगा गणेश संपत शिकलगार व सासू मंगल बकश शिकलगार (सर्व रा. वेताळपेठ) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी उत्तम प्रकाश शिकलगार (वय ३३ रा. शिकलगार वसाहत कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील वेताळपेठ परिसरात संपत शिकलगार कुटुंबियांसह राहण्यास आहे. संपत शिकलगार याची पत्नी राखी हिने २५ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजीएम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तर पत्नी राखी हिचा मृत्यू झाल्याने अस्वस्थ बनलेल्या पती संपत शिकलगार याने इचलकरंजीकडे येत असताना अंकली पुलावरुन नदीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला वाचविण्यात आले होते

 सासरच्या मंडळीकडून राखी हिला त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून राखीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊ उत्तम शिकलगार याने फिर्याद दिली आहे.