वाळवा, शिरगाव (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या लाईटचा प्रश्न अतिशय गंभीर होता. पुरेशी लाईट मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील पिके वाळून जाण्याची भिती निर्माण झाली होती अशावेळी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे धाव घेतली शेतकऱ्यांच्या अडचणीची गंभीर दखल महावितरण कंपनीने घेऊन शेतीसाठी लागणारी लाईट उपलब्ध करून दिली. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शिरगाव (ता. वाळवा) या गावांसाठी किर्लोस्करवाडी उपकेंद्रातून शेतीसाठी लाईट मिळत होती परंतु उन्हाळ्यात या ठिकाणी अतिशय लोड वाढत असल्याने आठ तासापैकी फक्त चार तासच लाईट शिरगाव मधील शेतीसाठी उपलब्ध होत होती यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या गावासाठी वाळवा येथून लाईट मिळाल्यास हा प्रश्न सुटणार होता. परंतु शिरगाव व वाळवा गावाच्यामधून कृष्णा नदी जाते त्यामुळे लाईन टाकायची कशी हा मोठा प्रश्न होता या कामासाठी महावितरण कंपनीने सर्वे करून आर. डी. एस. एस. स्कीम अंतर्गत हे काम कमी वेळात पूर्ण केले. यासाठी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार केला. या कामासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता केदारनाथ साळी, उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर, नजीर मुजावर, संतोष माने, वैभव कुंभार यांनी मदत केली. यावेळी वायरमन संतोष माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच दिलीप वाघमारे, उपसरपंच अंजली पवार, बजरंग आंबी, माणिक पवार, भीमराव मचाले, संजय आंबे, दीपक चव्हाण, विनोद हवलदार, प्रकाश शिंदे, अक्षय माने, हिम्मत वाघमारे, गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.