नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, बहुतांशी कार्यकर्तेही ‘खोबरे तिकडे चांगभलं’

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सध्या वाळवा-शिराळा तालुक्यातील विविध नेते आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत विविध खेळ्या करत असल्याचे अंतर्गत स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे करतात. त्यामुळे कार्यकर्ते आता कोलांट उड्या मारू लागले आहेत. बहुतांशी कार्यकर्त्यांची भूमिका खोबरे तिकडे चांगभलं अशीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

वाळवा तालुक्यात आजही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदमध्ये नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे दिसून आल्याने महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात नेते आपापल्या सोयीप्रमाणे राजकारण करताना दिसतात. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार खोबरे तिकडे चांगभलं अशीच भूमिका घेतात.

वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यांच्याकडे आष्टा नगरपालिका आणि परिसरातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात दिवंगत विलासराव शिंदे यांचा गट एकत्रित आहे. या विरोधात हुतात्मा संकुलनाचे नेते गौरव नायकवडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आ. सदाभाऊ खोत यांच्या भूमिका विरोधात आहेत. त्यामुळेच महायुतीकडे नेतृत्वाचा अभाव आहे.

अशीच अवस्था शिराळा तालुक्यात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आ. मानसिंगराव नाईक यांचा गट सक्षम असला तरी त्यांच्या विरोधात भाजपचे आ. सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप पुरस्कृत आ. सदाभाऊ खोत आदी नेते एकवटून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादींचे मिलन!

वाळवा आणि शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा गट आहे. परंतु दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

अशी आहे जिल्हा परिषद गट व गणाची रचना

वाळवा तालुक्यात एकूण १२ जिल्हा परिषद गट येतात. त्यामध्ये रेठरेहरणाक्ष, बोरगाव, कासेगव, वाटेगाव, पेठ, वाळवा, कामेरी, चिकुर्डे, बावची, बागणी, येलूर येत असून याच तालुक्यात २२ पंचायत समिती गण आहेत. तर शिराळा तालुक्यात पणुंब्रे वारुण कोकरूड, वाकुर्डे, मांगले असे ४ जिल्हा परिषद गट त्यामध्ये ८ पंचायत समिती गण आहेत. निवडणुकीचा कालावधी अगदीच अल्प असल्याने अद्यापि उमेदवार निश्चित झाले नाहीत.