विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सूत्रधार असलेले सागर चोथे आणि विनोद सावंत या दोन्ही आरोपींना पोलिसांनी छापा टाकून पुणे येथे अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विटा येथील न्यूज चॅनेल चे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर ११ फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून कोयता आणि स्टीलच्या रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. तर गुन्हा घडत असतानाच यूज चॅनेलच्या च्या ऑफिस खाली दबा धरून बसलेले तसेच कटात सहभागी असलेल्या अभिषेक चंद्रकांत आदाटे आणि सचिन रामचंद्र तावरे या दोन्ही करून ताब्यात घेण्यात आले.
मात्र, या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले सागर चोथे आणि विनोद सावंत हे दोन्ही आपले मोबाईल बंद करून गेल्या बारा दिवसांपासून फरार होते. विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर पोलिसांनी पुणे येथून सागर चोथे आणि विनोद सावंत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विटा न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण ? याचा तातडीने खुलासा व्हावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
