सध्याची वेळ ही दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची आहे, राजकीय टीकाटिप्पणीचे नंतर पहाता येईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत बोलताना मांडली.
दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांशी लढण्याच्या भारताच्या संकल्पाची माहिती आपण जागतिक नेत्यांना देऊ असेही सुळे यांनी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर पाकिस्तानचा कावा जगासमोर सांगण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध देशांत पाठविण्यात येणाऱ्यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व सुळे करत आहेत. या संपूर्ण लष्करी मोहीमेच्या विषयावर राजकारणाला जागा नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगून इंडिया आघाडीतील कॉंग्रेसलाही घरचा आहेर दिला.
भारत दहशतवाद आणि त्याच्या प्रायोजकांविरुद्ध एकजूट आहे हे जगाला सांगण्याची ही वेळ आहे असेही सुळे म्हणाल्या.
विदेशांत जाणाऱ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या सुळे यांच्या शिष्टमंडळात भाजपचे राजीव प्रताप रुडी, अनुराग ठाकूर आणि व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे मनीष तिवारी आणि आनंद शर्मा, तेलुगू देसम पक्षाचे नेते एल श्रीकृष्ण देवरायलू, आपचे विक्रमजीतसिंग साहनी आणि माजी राजनयिक सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.
सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या राजकारणाची नाही तर भारताबद्दल जागतिक पातळीवर बोलण्याची वेळ आहे. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला हल्ला हा भारताच्या आत्म्यावर हल्ला होता. दहशतवादाचे प्रायोजकत्व करणाऱ्यांबाबत कोणतीही उदारता दाखवू नये असा स्पष्ट संदेश देण्यासाठी आमचा प्रतिसाद संतुलित होता. काँग्रेसकडून या मुद्द्याचे राजकारण सुरू असल्याच्या प्रयत्नांवर सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या वतीने स्पष्ट केले आहे की ही राजकारण किंवा टीका करण्याची वेळ नाही.
आपल्या सर्वांकडे केंद्र सरकारला विचारण्यासाठी काही कठीण प्रश्न आहेत. परंतु सरकारसोबत एकजूट राहण्याची सध्याची वेळ आहे. भारत एकजूट आहे आणि दहशतवादाबद्दल कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही हे दाखवण्याची ही वेळ आहे. राजकीय वक्तृत्वात रमण्याची ही वेळ नाही. सत्तेत कोणीही असो, ‘प्रथम राष्ट्र, नंतर राज्य, नंतर पक्ष आणि नंतर कुटुंब,” असेच आमच्या पक्षाचे धोरण होते, आहे व असेल असेही सुळे म्हणाल्या.