सनरायजर्स हैदराबादचा KKR वर मोठा विजय

आयपीएल 2025 मध्ये 68 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान फटकेबाजी करून तब्बल 278 धावांचा स्कोअर उभा केला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू हे आव्हान पूर्ण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे हैदराबाद संघाचा 110 धावांनी विजय झाला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 32, ट्रेव्हिस हेडने 76, ईशान किशनने 29, अनिकेत वर्माने 12 तर हेन्रीचं क्लासेनने 105 धावांची कामगिरी केली. क्लासेनने 39 बॉलमध्ये 105 धावा केल्या. या दरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार लगावले. हेन्रीचं क्लासेनने मारलेलं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक ठरलं.

सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 279 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात कोलकाता नाईट रायडर्स अपयशी ठरले. सनरायजर्स हैदराबादकडून जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. सनरायजर्स हैदराबादचा आयपीएल 2025 मधील हा शेवटचा सामना होता, यात विजय मिळवण्यात त्यांना यश आले. कोलकाताच्या सर्व फलंदाजांना ऑलआउट करण्यात हैदराबादला यश आले. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ यापूर्वीच प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता तर सनरायजर्स हैदराबाद संघ हा उपविजेता ठरला होता.