महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा घुमणार का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे वक्तव्य राजकीय वरीष्ठ नेतेमंडळींकडूनकेले जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विचित्र परिस्थिती दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर + महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडीतीलनेत्यांचे सूर जुळणे अवघड दिसते. सर्वच पक्षांमध्ये नेते अधिक झाल्यामुळे आणि सर्वांनाच एक नंबरचे पद हवे असल्याने राजकीय संघर्ष तीव्र होणार आहे. त्यामुळेच महायुती विरूध्द महाआघाडी ऐवजी स्वतंत्रपणे लढल्यास किंवा स्थानिक पातळीवर आघाडीच्या माध्यमातून लढण्यास अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. त्यादृष्टीने शहरातील राजकीय पक्ष व गटांकडून हालचाली सुरू असल्याचे दिसते.

 
महायुती मधील भाजपा आम. राहुल आवाडे यांनी स्वतंत्र लढण्याची परवानगी मागितली आहे. तेव्हा याला भाजपाकडून मान्यता मिळणार का ? तसेच मान्यता मिळाल्यास महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे कोणती भूमिका घेणार याकडे पहावे लागणार आहे. दरम्यान, ऐनवेळी कोणताही निर्णय झाल्यास त्याला सामोरे जाण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत चाचपणी सुरू केली आहे.

दरम्यान, महायुतीमध्ये जी स्थिती आहे, अशीच स्थिती महाविकास आघाडीमध्ये दिसून येते. महाआघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यासह अन्य लहान-लहान पक्ष असले तरी स्थानिक पातळीवर त्यांचा म्हणावा तितका प्रभाव दिसून येत नाही. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर असलेल्या मँचेस्टर आघाडीतील नेते मंडळींकडूनमहाआघाडीसह इतरांना सोबत घेऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

 
पण शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे शिवसेना जाण्यास इच्छुक असल्याचे दिसते. अशावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडीत सामील होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिकेत सत्ता काबीज करून पहिला महापौर बनवण्याचा पण सर्वच पक्षांकडून प्रयत्न केला जात असला तरी ते निवडणुकीला कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार, यावरच सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे तूर्त ‘थांबा आणि पहा’ असे बोलले जात आहे.

 लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि विधानसभेला भाजपचे उमेदवार राहल आवाडे असल्यामुळे शिंदे गटाला महायुतीचे सोपस्कर पाळणे क्रमप्राप्त होते. अशीच स्थिती महाआघाडीची होती. लोकसभेला ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील-सरूडकर तर विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मदन कारंडे हे रिंगणात होते. तेव्हा वरीष्ठांच्या शब्दामुळे आघाडी धर्म पाळणे बंधनकारक होते. पण आता स्थानिक पातळीवर आघाडी धर्माचे पालन होणार का ? असा प्रश्न होत असल्यामुळेच स्वबळावर निवडणुका लढाविण्याचे संकेत सर्वच पक्षांकडून दिले जात असल्याचे दिसते.