पावसामुळे शहरातील काही रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्यावतीने काही भागात सध्या मुरूम टाकून खड्डे बुजवून तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याने नागरिक तसेच वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक भागातील रस्त्यांचे डाबरीकरण करण्यात आले. मात्र, पावसामुळे काही भागातील रस्ते डाबरीकरणाचे काम थांबले तर काही ठिकाणी काम अपूर्ण राहिल्याचे दिसते. महासत्ता चौक रिंगरोड ते निरामय हॉस्पीटल रोडवर तसेच थोरात चौक परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचून राहिले असून रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.सांगली रोडवरही एक-दोन आठवड्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यानजीकच खड्डे पडल्याने पाणी साचून रहाताना दिसत आहे. याशिवाय स्टेशन रोडवर पाणी साचून रहात असल्याने येथे तळे निर्माण झाले आहे. अमराई रोडवरही काही ठिकाणी खड्डे पडले असून महापालिकेकडून सदरचे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येत आहेत.
