सांगोला, सांगोला – पंढरपूर रोडवरील मांजरी नजीक विरुद्ध दिशेने आलेल्या एस. टी. बसने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण जखमी झाला. याप्रकरणी श्रीकांत शत्रुघ्न कांबळे (रा. पोहरगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांनी एस.टी. बस चालक बालाजी वैजिनाथ मडुळे (रत्नागिरी, बस डेपो) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मंगेश भारत कांबळे असे अपघातात मृताचे नांव असून तर दिपक भागवत गायकवाड (रा. पोहरगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
श्रीकांत कांबळे यांचा चुलत भाऊ मंगेश भारत कांबळे व दिपक भागवत गायकवाड हे दोघे सकाळी साडेआठ सुमारास मोटारसायकलवरून सांगोला येथील बाजारात गाय घेण्यासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बाजार संपल्यानंतर गावी परत जात असताना सांगोला ते पंढरपूर मार्गावरील मौजे मांजरी येथे पेट्रोलपंपासमोरील ब्रिजवर आले असता, लातूर ते रत्नागिरी बसने समोरून जोराची धडक दिली. सदर अपघातात मंगेश कांबळे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तसेच उजव्या हातास खरचटल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला दिपक गायकवाड यास डोक्यास तसेच हातापायास मार लागून तो जखमी झाला.