सोलापूर जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) आतापर्यंत पाच रुग्ण आहेत, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत चारही रुग्णांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हे चारही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पुण्यात जीबीएसची (GBS) लागण झालेल्या रुग्णाचा २६ जानेवारी रोजी उपचारादरम्यान सोलापुरात मृत्यू झाला होता. प्राथमिक अहवालानुसार त्या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचे दिसत आहे.
मात्र, शंभर टक्के खात्री करण्यासाठी त्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला, हे समजणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन जीबीएसबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सोलापुरात आतापर्यंत जीबीएसचे 5 रुग्ण आढळून आले आहेत.या आजाराबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी त्याची लक्षणं, उपचारासाठी काय करावं, याची माहितीसाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत.
सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पाच रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात संशयित आणि 1 मृत असे जीबीएसचे एकूण 5 रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळले आहेत. यातील चारही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
येत्या 30 तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ‘हाऊस टू हाऊस’ सर्वे करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व GBS रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलं आहे.