इचलकरंजी, शहरातील मिळकतधारकांवर लादलेला सेफ्टीक टँक उपसा कर ठरावास स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना दिले आहे. सेफ्टीक टँक उपसा करण्याची सेवा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मक्तेदाराच्या माध्यमातून ही सेवा देण्याचा महापालिकेचा निर्णय अत्यंत चुकीचा व मिळकतधारकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे मिळकतधारकांवर आकारण्यात आलेले ७५० रुपये शुल्क कर देयकातून न वगळ्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या मिळकतधारकांना कर देयके देण्याची प्रक्रीया महापालिकेकडून सुरु आहे. ज्या मिळकतधारकांनी आपली शौचालये भुयारी गटारीला जोडलेली नाहीत, त्यांना वार्षिक २५० रुपये याप्रमाणे तीन वर्षाचे ७५० रुपयांची आकारणी कर देयकात केलेली आहे. याबाबत प्रशासकीय ठराव करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरु केली आहे.
शहरातील ५८ हजार पैकी २३ हजार ८०५ मिळकतधारकांवर हा बोजा पडणार आहे. विशेषतः भोने माळ, शहापूर, कबनूर वाढीव भाग परिसरातील मिळकतधारकांवर हा बोजा पडणार आहे. इचलकरंजी शहरात ९८ कोटी ५० लाखांची भुयारी गटार योजना २०१४ मध्ये सुरु झाली. पण अद्यापही या गटारीला शौचालय जोडण्यात आलेली नाहीत. त्याला संपूर्णता तत्कालीन नगरपरिषद व आताची महापालिका जबाबदार आहे. त्यामुळे याबाबतचा बोजा मिळकतधारकांवर टाकण्याचे कोणतेच कारण नाही. त्यामुळे या संदर्भात करण्यात आलेला प्रशासकीय ठरावास स्थगिती द्यावी, असे बावचकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.