इस्लामपूर, पोलीस असल्याचा बनाव करत कामेरी ता. वाळवा गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या अशोक लेलंड चा पाठलाग करत जाऊन गाडीची तपासणी करण्याचे कारण सांगत दोन अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६७ हजार ८७० रुपये लुटल्याची घटना मंगळवार २७ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद ट्रक चालक फाजल अहमद खान रा. केरेबिल्ली, ता. चनगरी, जि. दौनगेरी, कर्नाटक यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, चालक फाजल खान अशोक लेलंड ट्रक क्र. केए-१७-ए ए ०९८८ पुणे बेंगलोर महामार्गावरून कामेरी गावच्या हद्दीत आले असता पाठीमागून मोटर सायकल वरून ४०-४५ वयोगटातील दोन अज्ञात इसम आले व गाडी थांबवत आम्ही पोलीस आहोत. तुमच्या गाडीची तपासणी करायची आहे असे सांगत गाडीत शिरले. त्यानंतर गाडीत असलेली रोख रक्कम १,६७,७८० रुपये लुबाडून पलायन केले. दोन अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनि वरुटे करत आहेत.