सांगोल्यात थंडीने हुडहुडी! पेटू लागल्या शेकोट्या

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने या आठवड्यात पुनरागमन केल्याने अनेकांना हुडहुडी भरत आहे. थंडीसाठी अनेकांनी शाल मफलर टोपी स्वेटरचा वापर सुरू केलेला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना खूपच मागणी वाढलेली आहे. तसेच उब मिळवण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या जात आहेत. सांगोला तालुक्यात यंदा पावसाने कमी-जास्त हजेरी लावल्याने आधी अतिवृष्टी नंतर ओढ व पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने खरीप पिके हातातून गेली आहेत. दुष्काळाने पिकांची दाणादाण उडवली त्यात पशुधनाला आजाराने ग्रासले त्यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झालेले आहे तसेच त्यात गारठा वाढला आहे. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे या पंधरवड्यात उरलेले पीक कोमेजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. थंडीने पुन्हा एकदा जोर धरल्याने सांगोला तालुक्यात हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे दिवस-रात्र अनेकांना थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घालावे लागत आहेत.

त्यामुळे उबदार कपड्यांची बाजारपेठ खूपच गर्दीने भरली आहे. तसेच शासकीय कार्यालयात कर्मचारी संख्या काहीशी रोडवलेली दिसत आहे. शाळा महाविद्यालयावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

रोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही कमी झाली आहे. वाढत्या थंडीचा परिणाम हा बाजारपेठांवर ही दिसून येत आहे. हिवाळी सुकामेवा वर मात्र आता अनेकांनी ताव मारण्यास सुरुवात केली आहे. तर सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखी अनेकांची वाढली आहे मिळवण्यासाठी अनेकांनी शेकोटीचा आधार घेतला असल्याचे सांगोला तालुक्यात पहावयास मिळत आहे.