आरबीआयच्या रेपो दर कपातीने शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स ७५० अंकांनी वधारला

भारतीय शेअर बाजारात ६ जून रोजी प्रचंड तेजी दिसून आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात ०.५० टक्के कपातीची घोषणा केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी उसळी घेतली. आरबीआयने कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआर १% ने कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. शेअर बाजाराने या निर्णयाचे स्वागत केले. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारून ८२,१८९ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टीने २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टी २५,००३.०५ च्या पातळीवर बंद झाला. यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

बँकिंग, वित्तीय आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. बँक निफ्टी व्यवहारादरम्यान १.५% वाढून ५६,६९५ या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक १.८% ने वाढून बंद झाला. तर पीएसयू बँक निर्देशांक ०.६% ने वाढला. निफ्टी रिअॅल्टी निर्देशांक ४.५% वाढला. ऑटो आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्येही १.५% पेक्षा जास्त वाढ झाली. मीडिया क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारून बंद झाले. या तेजीत निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे १.२% वाढ दिसून आली.

६ जून रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४५१.०६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यवहार दिवशी म्हणजेच गुरुवार ५ जून रोजी ४४७.५० लाख कोटी रुपये होते. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.५६ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ५.०१ टक्के वाढ झाली. यानंतर, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स २.१८ टक्क्यांवरून ३.११ टक्क्यांनी वाढून बंद झाले. सेन्सेक्समधील फक्त २ शेअर्स घसरून बंद झाले. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ०.३९ टक्क्यांची घसरण झाली. तर सन फार्माचे शेअर्स ०.१० टक्क्यांनी घसरून बंद झाले.