आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक माजी नगरसेवक अविनाश तावडे, उद्योजक यशवंत साबळे, विक्रम साबळे यांच्या सहित त्यांच्या सहकाऱ्यानी आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का देत पनवेल येथील कार्यक्रमात भाजपचे (BJP) प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.
आगामी खोपोली नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात असून साबळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आ. महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वपूर्ण वाटा असणारे साचळे यांच्या भापज प्रवेशाने नगरपालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलणार असल्याची चर्चा सुरू आहे. खोपोलीतील प्रतिथयश उद्योजक यशवंत साबळे, माजी नगरसेवक आणि शेकापक्षाचे माजी शहर चिटणीस अविनाश ताबडे, युवा नेते विक्रम साबळे यांच्यासह सुहास वझरकर, इर्शाद खान, चिराग रावळ, भीमा मोरे, अजिंक्य ताबडे यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यशवंत साबळे यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. साबळे यांचे पिताश्री स्वर्गिय एल. एम. साबळे यांनी खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
माजी नगरसेवक आणि शेकापक्षाचे माजी शहर चिटणीस अविनाश तावडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपुर्वी तावडे यांनी शेकापचे चिटणीस पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तावडे यांनी खोपोली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपली छाप पाडली आहे. मी भाजपमध्ये केलेला प्रवेश माझ्या स्वार्थासाठी नसून मी हा प्रवेश खोपोलीच्या सर्वागीण विकासासाठी केला असून खोपोलीचा कायापालट या प्रवेशातून होणार आहे. तसेच लवकरच खोपोलीत भाजपची ताकद वाढण्यासाठी निस्वार्थीपणे करेन, असं यशवंत साबळे म्हणाले.